सोमवारी आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (RR VS GT) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरातवर 8 विकेट्स आणि जवळपास 5 ओव्हर राखून विजय मिळवला. यात राजस्थानकडून खेळणारे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी (vaibhav suryavanshi) हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले. यशस्वीने 70 धावा तर १४ वर्षांच्या वैभवने ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. वैभव हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. वैभवच्या या खेळीनंतर त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, असे असतानाच आता त्याच्या आई वडिलांची सुद्धा पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाच्या रेकॉर्ड ब्रेक शतकावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘वैभवने आयपीएल सामन्यात केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकून आपली टीम राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या कामगिरीसाठी आम्ही खूप खुश आहोत. आमच्या सोबतच संपूर्ण बिहार, आमचा जिल्हा आणि देश वैभवच्या या दमदार खेळीवर आनंद व्यक्त करत आहेत. वैभवच्या या कामगिरीसाठी आम्ही राजस्थान रॉयल्सच्या संपूर्ण मॅनेजमेंटचे आणि खेळाडूंचे आभार मानू इच्छितो.
मागील तीन ते चार महिन्यांपासून राजस्थान रॉयल्सने वैभवला त्यांच्याकडे ठेवले होते आणि त्याला अतिशय उत्तम प्रकारे कोचिंग आणि ट्रेनिंग देण्यात आली. हेड कोच राहुल द्रविड, बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि इतर कोच मिळून वैभवचा खेळ सुधारत होते आणि वैभव सुद्धा खूप मेहनत करत होता. याचाच परिणाम आहे की तो खूप चांगला खेळतोय. यासोबतच त्यांनी बिहार क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानले कि त्यांनी खूपच कमी वयात वैभवला बिहार टीमकडून खेळण्याची संधी दिली. त्यामुळेच वैभव आज चांगला खेळून या उंचीवर पोहोचलाय.