इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे.ललित मोदींनी आता वानुआटू (Vanuatu) या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यालं होतं. मात्र आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. वानुआटूचे पंतप्रधान जॉथम नापत (Vanuatu Prime Minister Jotham Napat) यांनी सोमवारी सिटीझनशीप कमिशनला ललिल मोदी यांचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्र वानुआटूचे नागरिकत्व प्रत्यार्पणापासून बचाव करण्यासाठी घेतल्याचा आरोप नापत यांनी केला आहे.
आयपीएलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी ललित मोदी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, याबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांमधून माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. “मी सिटीझनशीप कमिशनला ललित मोदीचा वानुआटु पासपोर्ट रद्द करण्याची कार्यवाही ताबडतोब सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती पंतप्रधान नापट यांनी एका अधिकृत निवेदनात दिली.
ललित मोदींच्या नागरिकत्वाच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये इंटरपोलच्या स्क्रिनिंगचा देखील समावेश होता. मात्र त्यावेळी कोणतेही गुन्हा सिद्ध झालेला नसल्याने त्यामध्ये काहीही आढळून आले नाही. पुरेशा कायदेशीर पुराव्यांच्या अभावामुळे इंटरपोलने दोन वेळा भारताची ललित मोदीविरोधात अलर्ट नोटीस जारी करण्याची विनंती फेटाळून लावली. मात्र, आता ही बाब नुकतीच काही रिपोर्टमधून उघड झाली.