कॉमेडियन कुणाल कामरा हा सध्या चर्चेत आला आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता सादर केली होती. यावरुन राज्यात जोरदार राजकारण तापले आहे. कुणालचा स्टुडिओ देखील शिंदे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी फोडला. यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दोन वेळा समन्स बजावून देखील कुणाल कामरा पोलीस स्टेशनला हजर होत नसल्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या शोला आलेल्या प्रेक्षकांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी प्रेक्षकांना नोटीस बजावली आहे. यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत.
वडेट्टीवार म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा हा कळस आहे. कोणी कुठे जावं, काय ऐकावं यावर काही बंधन आहे का? ते प्रेक्षक करमणुकीसाठी गेले होते. जर त्या प्रेक्षकांना नोटीस बजावली जात असेल, तर या देशामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, हुकूमशाही आणि गुंडशाहीचे राज्य झाले आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
यावेळी विविध राजकीय विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांचा खून करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर दावा केला. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघे सत्तेतील व्यक्ती एकमेकांवर आरोप करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, गुंडगिरी करणारी माणसं आता सत्तेत आहेत. धसांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून, उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या खुनापर्यंतचा कट रचला जात असेल तर सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. आरोपीवर कारवाई करावी,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.