कडक उन्हाच्या झळा आता जाणवायला लागल्या आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी वाढली असून धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.
पावसाळ्यास अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर मुंबईकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. त्यांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो.
धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत एकूण ४२ टक्के म्हणजेच ६ लाख १६ हजार ५५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.
याच कालावधीत सन २०२३च्या तुलनेत २०२४मध्ये पाणीसाठा कमी झाल्याने ५ जून २०२४पासून १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. त्या आधी ३० मे २०२४पासून पाच टक्के पाणीकपात लागू होती. त्यामुळे यंदा पाणीकपात होणार का याकडे लक्ष आहे.