लोकप्रिय मराठमोळे अभिनेते भरत जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ‘सही रे सही’ या नाटकामळे चर्चेत आहेत. त्यांचं हे गाजलेलं नाटक आहे. भरत जाधव हे गेल्या 23 वर्षांपासून या नाटकाचे प्रयोग करत आहेत. हे नाटक 23 वर्षांपासून सुरु असलं तरी सुद्धा नाटक पाहायला प्रेक्षकांची गर्दी असते. या नाटकाचे 4 हजार पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. तर या सगळ्यात हे नाटक कधी बंद होईल याचा विचारही कधी त्यांच्या चाहत्यांनी केला नसेल. तर आता या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाटक कधी बंद होणार यावर भाष्य केलं आहे.
केदार शिंदे यांनी नाटक, टिव्ही आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये दिग्दर्शक केलं आहे. तर सगळ्यात जास्त काय आवडतं याविषयी विचारताच केदार शिंदे उत्तर देत म्हणाले की ‘ माझ्या आवडत्या माध्यमाविषयी बोलायचं झालं तर ते नाटक आहे. ती एक जिवंत कला आहे, पण नाटक हे खरंतर नटाचं माध्यम आहे. सही रे सही मी लिहिलं आणि बसवलं. त्यानंतर भरतनं ते प्रेक्षकांसमोर आणलं. काही झालं तरी शेवटी स्टेजवर भरत दिसतो. भरत हा एक शिस्तप्रिय नट आहे. त्यामुळेच हे नाटक 23 वर्षांपासून आजपर्यंत सुरु आहे. मी 2 तास 20 मिनिटांचं नाटक बसवल होतं ते आजही तसंच सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे भरत न कंटाळता हे नाटक करतो. मला कोणी विचारलं होतंकी सही रे सही हे नाटक कधी होणार नाही? ज्या दिवशी भरत जाधव म्हणेल की आता मला जमत नाही. त्या दिवशीच नाटक बंद होईल. कारण त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. नाटक बसवेपर्यंत ते मला माझं माध्यम वाटतं पण जेव्हा एकदा पडदा उघडला की ते नटाचं माध्यम झालं.’