हैदराबादमध्ये एका ६० वर्षीय महिलेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित महिलेच्या भावाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या भावाने क्रिकेटपटू ख्रिस गेल कंपनीचा प्रवर्तक असल्याचे भासवून तिची फसवणूक केली. या महिलेने तिच्या भावासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका कॉफी पावडर बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून २.८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे.
२०१९ मध्ये या व्यावसायिक महिलेशी तिच्या भावाने आणि त्याच्या पत्नीने संपर्क साधला. ज्यांनी तिला गुंतवणुकीवर मासिक ४ टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच त्यांनी सांगितलं की हे पैसे केनियातील एका कॉफी पावडर उत्पादन कंपनीला निधी देण्यासाठी वापरले जाणार आहेत. ही कंपनी अमेरिकेत नवीन युनिट सुरु करत आहे, असं सांगून संबंधित महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी तक्रारदार महिलेला वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ख्रिस गेलचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. तसेच तो देखील या व्यवसायात प्रवर्तक म्हणून सहभागी असल्याचं सांगून विश्वास संपादन केला.
पण काही कालावधीनंतर पैसे परतावा देणं बंद झालं. त्यानंतर तक्रारदार महिलेने तिच्या भावाला विचारलं असता तेव्हा टाळाटाळ सुरु केली. यानंतर महिलेने आरोपीला पुन्हा पैशाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला शिवीगाळ केली. यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.