मुंबईत डिजिटल अरेस्टचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात तब्बल २० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील ८६ वर्षीय महिलेसोबत हा घोटाळा झाला आहे.
सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित वृद्ध महिलेला फोन केला होता. आधार कार्डचा अवैध कामासाठी वापर झाल्याचे सांगून पीडितेच्या खात्यामधील पैसे विविध बँक खात्यात वळवून घेण्यात आले.
२६ डिसेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या काळात सदर घोटाळा झाला असून या काळात आरोपींनी एकूण २०.२५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर पोलीस शाखेने दोन जणांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शायन जमील शेख (२०) आणि राजीक आझम बट (२०) या दोन आरोपींना अटक केली आहे. ते अनुक्रमे मालाड (पश्चिम) आणि मीरा रोड (पूर्व) येथे राहतात. यापैकी बट हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याने टेलिग्रामवर १३ विदेशी नागरिकांचा एक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर भारतीय बँक खात्यांची माहिती पुरविली गेली होती. घोटाळ्याशी संबंधित ही खाती असल्याचे समोर आले आहे.