टीबी या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणण्याचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असले तरीही त्याला अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही. जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण हे भारतात आढळून येतात व त्या रुग्णांमधील दहा टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याची चिंताजनक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात २०२४मध्ये २ लाख ३० हजार ५१५ टीबी रुग्णांची नोंद झाली होती. २०२५पर्यंत राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यात ३९ हजार ७०५ टीबी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. २०२३च्या तुलनेमध्ये २०२४मध्ये राज्यातील टीबी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. टीबीबद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक टीबी दिवस म्हणून साजरा केला जातो. आरोग्य विभागाने नियमित सर्वेक्षणाद्वारे सक्रिय टीबी रुग्णशोध मोहीम तसेच शंभर दिवस मोहिमेसारख्या विशेष मोहिमा प्रभावीपणे राबवून संशयित टीबीरुग्ण शोधून या आजाराचे निदान केले जात आहे. यासाठी छातीचा एक्स रे काढून थुंकीची यंत्राद्वारे तसेच सूक्ष्मदर्शकाद्वारे मोफत नमुना तपासणी करून टीबीचे निदान केले जात आहे.
राज्यात केंद्रीय टीबीरोग विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्गदर्शक सूचनेनुसार २०२३ पासून दरवर्षी टीबीमुक्त पंचायत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातंर्गत २०२३ मध्ये एकूण ग्रामपंचायतीपैकी २,२५१ ग्रामपंचायती तर २०२४मध्ये ७,४०२ ग्रामपंचायती टीबीमुक्त करण्यात आल्या आहेत.