लखनऊ सुपर जायंट्सला यंदाचं इंडियन प्रिमिअर लीगचं म्हणजेच आयपीएल २०२५ चं पर्व खूपच निराशाजनकच गेलं. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली सातव्या स्थानावर राहून इंडियन प्रीमियर लीग हंगामातील त्यांच्या सर्वात वाईट कामगिरीची त्यांनी यंदा बरोबरी केली. लिलावात पंतला संघात घेण्यासाठी २७ कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केल्यानंतरही, लखनऊला सातत्य पूर्ण कामगिरी करता आली नाही. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, अत्यंत सुमार कामगिरीसाठी लखनऊच्या संघाकडून अडचणीत येणारी व्यक्ती पंत किंवा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर नाही. मालक संजवी गोएंका यांची पहिली वक्रदृष्टी माजी क्रिकेटपटू झहीर खानवर पडली आहे. लखनऊच्या संघाचा मार्गदर्शक असलेल्या झहीरला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.
लखनऊचे मालक संजीव गोएंका यांच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये आयपीएल २०२५ च्या हंगामानंतर जो संघ समोर आला आहे त्याने गोएंका फारसे प्रभावित झालेले नाहीत. त्यांना हा संघ फारचा चांगला रुचलेला नसल्याचं ‘क्रिकबझ’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याच अहवालात पुढे म्हटले आहे की, झहीरवर अधिक दबाव असून त्याला यंदाच्या हंगामापूर्वी एक वर्षाच्या करारावर मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एलएसजीने त्यांच्या १४ सामन्यांमध्ये फक्त सहा विजय मिळवले. त्यातही या सामन्यांपैकी अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत कर्णधार पंत लय गवसण्यासाठी झगडताना दिसला.
त्यामुळे झहीरबरोबर असलेला करार एलएसजीकडून पुन्हा केला जाईल की नाही याबद्दल शंका आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ पुन्हा झहीरवर कोणतीही जबाबदारी देण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच हा करार पुन्हा होण्याची शक्यता अगदीच धूसर असून झहीरचा डच्चू देण्याचा संजीव गोएंकांच्या संघाचा विचार आहे.