मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कितीही ट्रोल केलं तरी मालिका आणि कलाकार हे प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग असतात. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतात. अशीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’.

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत सगळेच कलाकार नवोदित होते. मात्र, या मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आणि या मालिकेनं व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेतून छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या अप्पीचा कलेक्टर होण्यापर्यंतचा जिद्दीचा प्रवास दाखविण्यात आला. या मालिकेतून दाखवलेली एका प्रेरणादायी कलेक्टरची गोष्ट प्रेक्षकांना भावली. पण, तीन वर्षांनंतर नुकताच मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेनं निरोप घेताच अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने कलेक्टर अपर्णाची भूमिका साकारली होती. तर अभिनेता रोहित परशुराम अर्जुनच्या भूमिकेत होता. मालिकेतील अप्पी-अर्जुनची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमोल म्हणून मालिकेत एन्ट्री घेत बालकलाकार साईराज केंद्रेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.