मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्लादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं लोकलमधील गर्दी कमी होणार आहे. अतिरिक्त मार्गिकेमुळं लोकलसह मालवाहतुकीच्या गाड्यांना फायदा होणार असून यासाठी चुनाभट्टी ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंतच्या हार्बर मार्गावर लोकलसाठी एलिव्हेटेड मार्गिका म्हणजे कुर्ला उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला आहे. या पुलामुळं अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार असून लोकलची गर्दी कमी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेची लांबी १७.५० किमी इतका आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या कुर्ला एलिव्हेटेड मार्गिकेसाठी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. तसंच, कुर्ला- परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी १०.१ किमी लांबीची नवीन रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. त्यामुळं कुर्ल्यापुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. १३३९ मीटर असा उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. यात सीएसएमटीच्या दिशेकडून ४१३ मीटर रॅम्प, पनवेलच्या दिशेने ४२२ मीटर रॅम्प आणि ५०४ मीटर इतका सपाट भाग आहे. याच उड्डाणपुलांवर हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानक असणार आहे.