भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा उत्सवाच्या वेळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. याचपार्श्वभूमीवर आता रेल्वेकडून स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली.
देशातील ६० प्रमुख रेल्वे स्थानके नेहमीच खूप गर्दीची असतात. आता या स्थानकांच्या बाहेर कायमस्वरूपी प्रतीक्षालय बनवले जातील. प्रवाशांना त्यांची ट्रेन येणार असेल तेव्हाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असेल. यामुळे स्टेशनवरील गोंधळ कमी होईल आणि प्रवाशांना ये-जा करणं ही सोपं होईल. या योजनेची चाचणी नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पटना स्थानकांवर सुरू झाली आहे.
या ६० स्थानकांवर पूर्ण प्रवेश नियंत्रण असेल. म्हणजेच ज्यांच्याकडे कन्फर्म तिकिटे आहेत त्यांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. सुरक्षा वाढवण्यासाठी आणि हालचाली सुलभ करण्यासाठी, सर्व बेकायदेशीर मार्ग बंद केले जातील. यामुळे तिकीट नसलेल्या लोकांची गर्दी कमी होईल आणि स्टेशनवरील सुरक्षा देखील वाढेल.