कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक प्रकारामुळे सगळा देश हादरला होता. या प्रकरणात आता पीडितेच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली आहे.
माझी मुलगी तर आता नाही. पण आम्हाला या प्रकरणात न्याय हवा आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचं आहे. किमान आता तरी आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे असंही पीडितेच्या आईने म्हटलं आहे.
कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेत आरोपी संजय रॉयला लगेचच अटक करण्यात आली. संजय रॉय हा विकृत प्रवृत्तीचा माणूस असल्याचं त्याच्या सासूने प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. तसंच महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी कोलकाता येथील सोनागाछी या ठिकाणी असलेल्या रेड लाइट भागात गेला होता अशीही माहिती समोर आली होती. दरम्यान जानेवारी २०२५ मध्ये कोर्टाने निकाल देत संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता पीडितेच्या आईने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.