हनीट्रॅपमध्ये अडकला भारतीय, आयएसआयला गोपनीय माहिती पुरवली!

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आयुध निर्माण कारखान्यात काम करणाऱ्या रविंद्र कुमार नामक व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) आग्रा येथून त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेत ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर पाकिस्तानस्थित हँडलर्सना लष्करासंबंधी गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

गेल्या वर्षी नेहा शर्मा असल्याचे भासवून एका महिलेने रविंद्र याच्याशी संपर्क केला होता. आपण पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे सांगून देखील ती रविंद्र याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाली. तपासात उघड झाले की, दोघांमधील संभाषण लपवून ठेवण्यासाठी रविंद्र याने त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर चंदन स्टोअर कीपर २ म्हणून सेव्ह केला होता. तसेच त्याने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात त्या महिलेला गोपनीय कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली.

तपासादरम्यान यूपी एटीएसला रविंद्र याच्या फोनमध्ये गोपनीय माहिती आढळून आली. ज्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आणि गोरखा रायफल रेजिमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या लॉजिस्टिक ड्रोन चाचण्यांबद्दलची गोपनीय माहितीचा समावेश आहे. रविंद्र हा पाकिस्तानातील आयएसआय हँडलर्सच्या थेट संपर्कात होता आणि भारतातील सुरक्षा प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती तो त्यांना पुरवत होता. रविंद्र याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याच्या आग्रा येथील सहकाऱ्यालाही अटक केली आहे. तसेच तपास यंत्रणांनी डिजीटल पुरवे जप्त केले आहेत. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट आणि गोपिनय कागदपत्रांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here