कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यात एका गावात होळीच्या दिवशी चार-पाच दुचाकीस्वारांनी शाळेतील विद्यार्थींनीचा पाठलाग करत त्यांच्यावर रासायनिक रंग फेकले. यामुळे या विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्या.
राज्य सरकारच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या काही विद्यार्थींनी परीक्षा देण्याकरता जात होत्या. लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुवर्णगिरी बस स्टॉपवर त्या बसची वाट पाहत होत्या. बसमध्ये चढताच काही तरुणांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या अंगावर रंग, अंडी आणि शेणखत फेकलं. तपासात विषारी द्रवात फिनाइल असल्याचंही स्पष्ट झालं.
विद्यार्थी तत्काळ बसमध्ये चढल्या आणि संरक्षणाकरता त्यांनी खिडक्या बंद केल्या. या टोळीने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला अन् बसमध्ये प्रवेश केला. बसमध्ये चढल्यावर रसायने मिसळेले रंग त्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. यामुळे विद्यार्थींनीना श्वास घेण्यास त्रास होत असून छातीत दुखणे आणि इतर लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तीन विद्यार्थींनीची प्रकृती गंभीर आहे.