राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी होळीनिमित्त केलेली सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचे कारण ठरत आहे. यामध्ये लालू प्रसाद यादव यांनी ‘जुने सगळं विसरून जा आणि एक नवी सुरुवात करूया’, अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या ऑफरमागील कारणे म्हणून जदयू आणि भाजपमधील वाढते अंतर आणि तेजस्वी यादव यांचे अलीकडील विधाने देखील सांगितली जात आहेत. बिहारमध्ये राजकीय शिमगा आता पहायला मिळतोय.
लालू प्रसाद यादव हे दरवर्षी त्यांच्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध असतात. यावेळी होळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमुळे चर्चा सुरु झाली आहे. नितीशकुमार यांच्यासाठी एक नवीन राजकीय ऑफर म्हणून या पोस्टकडे पाहिले जात आहे. समाजात प्रत्येक गोष्ट प्रेम आणि आपलेपणाच्या भावनेने घडली पाहिजे. सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा ! राजकीय तज्ज्ञांनी या शुभेच्छांना नितीश कुमार यांना महाआघाडीत सहभागी होण्याचे आमंत्रण मानले आहे. तेजस्वी यादव यांनीही अलीकडेच म्हटले होते की, नितीश कुमार कधी पक्ष बदलतील याची खात्री नाही. अनेक मुद्द्यांवर जदयू आणि भाजपमधील मतभेद देखील या ऑफरला बळ देत आहेत. ‘जुने विसरून नवीन सुरुवात करण्याबद्दल’ म्हटले आहे.
जेडीयू आणि भाजपमधील वाढते अंतर त्यात ही पोस्ट चर्चेचे कारण ठरत आहे. दोन्ही पक्षांचे विचार अनेक मुद्द्यांवर वेगवेगळे असल्याचे दिसून आले आहे. औरंगजेब, हिंदू राष्ट्र, बाबा बागेश्वर, होळी यांसारख्या मुद्द्यांवर भाजप नेत्यांच्या विधानांमुळे जेडीयू अस्वस्थ आहे. या विधानांमुळे नितीश कुमार यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळू शकते, अशी भीती जेडीयूला आहे. इतकेच नाहीतर, जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा यांनीही भाजप नेत्यांना वादग्रस्त विधाने टाळण्याचा सल्ला दिला आहे. नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणात पलटूराम म्हणून प्रसिद्ध आहेत. आता ते भाजप सोबत असले तरी कधी ते साथ सोडून इंडी आघाडीत जातील सांगता येत नाही. बिहारमध्ये या वर्षा अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच राजकीय वातावरण तापलं आहे.