कर्नाटकमध्ये सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजतोय. सहकार मंत्री के.एन.राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना केलेल्या एका आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका केंद्रीय नेत्यासह ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा मंत्री के.एन.राजन्ना यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आज कर्नाटकच्या विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
यातच आज कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं. त्यामुळे हनी ट्रॅपचा मुद्दा आणि सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारं विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत मोठा गदारोळ केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर काही कागदपत्रे भिरकावली. त्यामुळे सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी आता भाजपाच्या १८ आमदारांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या १८ आमदारांचं ६ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी केली होती. तसेच या कथित हनी ट्रॅप प्रकरणावरून शुक्रवारी विरोधी भाजपाच्या आमदारांनी सभागृहात कागदपत्रे फाडून गोंधळ घातला होता. त्यामुळे या कारणावरून कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी भाजपाच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.