इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच त्यांच्या पतीच्या आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला होता. नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी आता पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे.
“जेव्हा लोक गंभीरपणे आणि उत्कटतेने काहीतरी करू इच्छितात तेव्हा ते वेळेचा विचार करत नाहीत. माझ्या पतीने जवळ पैसे नसतानाही इन्फोसिस कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांच्यापाशी खूप मेहनती आणि समर्पित सहकारी होते. यामध्ये ते यशस्वी होऊ शकले कारण ते दिवसाचे ७० तास किंवा कदाचित त्याहूनही जास्त काम करायचे. जर त्यांनी इतके तास काम केले नसते तर इन्फोसिस आज इतकी मोठी कंपनी बनली नसती, असे सुधा मूर्ती म्हणाल्या. त्या एका वृत्वितवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी सुधा मूर्ती यांनी असेही सांगितले की, त्यांचे पती इन्फोसिसमध्ये कामात व्यस्त असताना त्यांनी घर आणि मुलांची संगोपन करण्याचे ठरवले. त्यावेळी, त्यांनी एका महाविद्यालयात संगणक विज्ञान शिकवण्यास सुरुवात केली. सुधा मूर्ती म्हणाल्या की, “गरीब असो वा श्रीमंत, सुंदर असो वा कुरूप, देवाने प्रत्येकाला २४ तास दिले आहेत आणि ते कसे वापरायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.”