केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. मात्र या विधेयकावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, वक्फ बोर्ड(दुरुस्ती) विधेयक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा संविधानावरील आणखी एक हल्ला आहे. हे विधेयक खोटा प्रचार पसरवून समाजातील सामाजिक सलोखा भंग करणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या परंपरांना बदनाम करून निवडणुकीच्या फायद्यासाठी ध्रुवीकरणाची परिस्थिती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जयराम रमेश यांनी म्हटलं की, “वक्फ (दुरुस्ती) विधेयक हा भाजपाच्या रणनीतीचा एक भाग आहे. बहु-धार्मिक समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. वक्फची जमीन वक्फला देण्याबाबत जाणीवपूर्वक संदिग्धता निर्माण करण्यासाठी वक्फची व्याख्या बदलण्यात आली आहे. वक्फ बोर्ड कमकुवत करण्यासाठी विद्यमान कायद्यातील तरतुदी विनाकारण काढून टाकल्या जात आहेत. हा अल्पसंख्याक समुदायांच्या परंपरा आणि संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून निवडणुकीच्या फायद्यासाठी आपला समाज कायमचा ध्रुवीकरणाच्या स्थितीत राहील”, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.