खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यावर सभागृहात बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप केला. त्यांनी विधान केले की, लोकसभा लोकशाही पद्धतीने चालवली जात नसून, महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याच्या त्यांच्या विनंत्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र, मी उभा राहिलो की मला बोलण्याची परवानगी नाकारली जाते. आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकारच दिला जात नाही. मी शांत बसलो होतो, तरीही मला संधी दिली नाही. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधकांना समान स्थान असते, पण या सभागृहात फक्त सरकारलाच महत्त्व दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याबद्दल भाषण दिले, त्यावर मला माझे विचार जोडायचे होते. बेरोजगारीसारख्या गंभीर विषयावर बोलायचे होते, पण संधीच दिली नाही.”
मात्र, विरोधी पक्षनेते जेव्हा सभागृहात त्यांच्या बाजूने भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना नियम दाखवून थांबवले जाते. त्याउलट, सरकारचे मंत्री किंवा भाजप खासदार उठले, की त्यांचे माइक लगेच सुरू होतात आणि त्यांना बोलण्याची संधी मिळते.”
तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी अगदी बरोबर सांगितले आहे. ते विरोधी पक्षनेते म्हणून केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर संपूर्ण विरोधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वीही त्यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली होती, आणि आज पुन्हा तसेच घडले. हे अत्यंत निंदनीय आहे.