रमजान महिन्यातील आजच्या शेवटच्या शुक्रवारी संभलमध्ये छतांवर तसेच, रस्त्यांवर नमाज अदा करण्यास पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली आहे. मशिदी व ईदगाहांमध्ये पारंपरिक पद्धतीने नमाज अदा करण्यावर मात्र कोणतेही निर्बंध नाहीत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दरम्यान, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर संभलमध्ये सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त राखण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून संभलमधील जामा मशिदीचे सर्वेक्षण सुरू झाले असता गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला मोठी दंगल उसळली होती. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून संभलमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. रमजानमधील अखेरच्या शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन व शांतता समितीमध्ये नुकतीच बैठक झाली. ‘शुक्रवारी छतांवर नमाज अदा करता येईल का, अशी विचारणा यावेळी झाली. त्यावर, संभलचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीश चंद्रा यांनी सांगितले की मशिदी व ईदगाह येथे पारंपरिक पद्धतीने नमाज पढण्यास हरकत नाही. परंतु, छतांवर मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे तेथे नमाज अदा करण्यास परवानगी नाही,’ असे ते म्हणाले. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील नमाजासही बंदी असेल. रस्त्यावरील नमाजावर अनेक वर्षांपासून बंदी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.