माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली होती. यानंतर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध दर्शविला. आता याबाबत भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची एक समिती नेमण्याची मागणी केली आहे. तसेच इतिहासात अशी कोणतीही नोंद नाही, असंही उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भातील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार उदयनराजे भोसले यांना विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, “वाघ्या, वाघ्या, कोण वाघ्या? येथे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे. मग ती समाधी तिथे कधी आली? का आली? इतिहासात तर अशी नोंद नाही. काहीका असेना. पण त्या माध्यमातून योग्य तो निर्णय घ्यावा”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.