स्टँड अप कॉमेडीच्या आड लपलेला छुपा अजेंडा!

स्टँड अप कॉमेडी हा विषय फक्त विनोदासाठी आणि मनोरंजनासाठी राहिलेला नाही. काही वर्षांपासून स्टँड अप कॉमेडीच्या आडून थिल्लरपणा, काहीतरी अचकट विचकट विनोद, कमरेखालचे विनोद, आई वडिलांवर विनोद, अश्लील भाषा असं त्याच एकंदरीत स्वरूप आहे. रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरून हे आपल्या लक्षात आलंच असेल. स्टँड-अप कॉमेडी’ हा विनोदाचा एक प्रभावी प्रकार असला तरी, त्याचा वापर अराजकता पसरवण्यासाठी केला जात असल्याचे काही उदाहरणे समोर येतात. त्यातीलच एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे कुणाल कामरा. आता काही जण म्हणतील आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचा हा प्रकार आहे. कामराच्या विनोदाचे स्वरूप केवळ राजकीय व्यंगापुरते मर्यादित नसून, तो सातत्याने एक विशिष्ट अराजकतावादी ‘नरेटिव्ह’ पुढे रेटतो. हे त्याने केलेल्या आधीच्या टीकेतून लक्षात येतं. तो केवळ सरकारविरोधीवक्तव्ये करत नाही, तर समाजात द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कामराच्या विनोदाची पद्धत आणि त्याच्या कृती ठराविक राजकीय विचारसरणी पुढे नेण्यासाठी वापरल्या जातात.

कुणाल कामरा आणि वाद

कुणाल कामरा हा एक स्टँड अप कॉमेडियन आहे. जाहिरात क्षेत्रात अकरा वर्षे काम केल्यानंतर कुणाल कामरा स्टँड अप कडे वळला. २०१७ मध्ये त्याने रमित वर्माच्या साथीने एक पॉडकास्ट सुरु केलं होतं. या कार्यक्रमात कुणाल कामरा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसंच प्रसिद्ध व्यक्तींशी अनौपचारिक गप्पा मारत असे. त्यानंतर तो स्टँड अप करु लागला. त्यानंतर वाद आणि कुणाल कामरा असं समीकरणच होऊन बसलं. सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले. मुस्लिम, शीख आणि मदर तेरेसा यांच्यावरील काही पोस्टमुळे कुणाल कामराला त्याचं X अकाउंट डिलीट करावं लागलं होतं. आणि मुंबईतलं घरही सोडलं होतं. 2019 मध्ये त्याला त्याचे दोन शो रद्द करावे लागले होते.
कुणाल कामरा हा कायमच मोदींच्या विरोधात टीका करताना दिसतो. त्यामुळे तो एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होतो आहे. दरम्यान २०१९ मध्ये भाजपाला लोकसभा निवडणुकीत जो विजय मिळवला होता त्यावरुनही त्याने भाजपाची खिल्ली उडवली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुकेश अंबानी यांचीही खिल्ली उडवली होती. कुणाल कामरा हा एक ‘सवयीचा गुन्हेगार’, अथवा एक ‘हॅबिच्युअल ऑफेंडर’ आहे. तो वारंवार जाणूनबुजून वादग्रस्त वक्तव्ये आणि कृती करतो, जेणेकरून प्रसिद्धी मिळवता येईल. त्याच्या कॉमेडीमध्ये विनोदाच्या नावाखाली राजकीय चिथावणी आणि द्वेष यांचा समावेश असतो. कुणाल कामरा आपल्या शोमधून आणि भाषणांमधून संघ व्यवस्थेला सातत्याने लक्ष्य करत असतो. मात्र, आजवर कोणत्याही संघ पदाधिकाऱ्याने त्याची साधी दखलही घेतलेली नाही.


कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुणाल कामराने अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले. मात्र, अर्णब गोस्वामी कुणालकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये आपलं काम करत राहिले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला. यानंतर झालेल्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये कुणालने अर्णब गोस्वामीच्या शांत राहण्याचीही यथेच्छ खिल्ली उडवली. या दोघांमधला वाद टोकाला गेला होता. तसंच इंडिगोने कुणाल कामरावर सहा महिने बंदी घातली होती. तसंच सरकारी विमान कंपनी एअर इंडियानेही कुणाल कामरावर बंदी घातली होती. स्पाइसजेटनेही असाच निर्णय तेव्हा घेतला होता. कुणाल कामराने नोव्हेंबर २०२० या महिन्यात सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. तसंच अर्णबच्या प्रकरणात माफी मागणार नाही असंही म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली ट्वीट डिलिट कऱण्यासही नकार दिला होता. त्यामुळेही कुणाल कामरा विरुद्ध सर्वोच्च न्यायालय यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं. कुणाल कामराच्या वादाची तर मालिकाच आहे.. पण अजून एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. स्वतःला तटस्थ म्हणवून घेताना त्यांनी केलेले विनोद हे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले दिसतात. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही तो सहभागी झाला होता.
अलीकडेच, त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारे विधान केले. त्याने थेट नाव न घेता, पण अतिशय अपमानास्पद पद्धतीने त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ही कृती निव्वळ हास्यास्पद नसून, हेतुपुरस्सर केलेला प्रचार आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कामराच्या शोसाठी जुहूमधील एक हॉटेल उद्धव ठाकरे गटाकडून आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे गटाने दिलेली ‘स्क्रिप्ट’ कामराने आपल्या कार्यक्रमात वापरल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या वादानंतर ठाकरे गटाने त्याची पाठराखण केल्याचं पण आपण पाहिलं.
राजकारणात कोणतीही घटना ही योगायोगाने किंवा अचानक घडत नसते. नियोजनबद्ध पद्धतीने राजकारणात घटना घडत असतात किंवा घडवल्या जातात. कुणाल कामरा याने या आधीही अशा पद्धतीने कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती . पण आताच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचं काय कारण. नीट विचार केला तर लक्षात येईल दिशा सालियन प्रकरण चर्चेत आलं आणि आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत होत्या.. या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी, दुसरीकडे वळवण्यासाठी कुणाला कामराला कामाला लावलं. कारण एकनाथ शिंदे यांच्यावर आता टीका करण्यासारखं काहीही नव्हत. आणि हे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावरच्या कवितेनंतर अनेक वादंग झाले.. माफी मागणार नाही अस त्या कामराने जाहीर केलं. एवढंच नाही तर हातात संविधानाची प्रत घेऊन एक पोस्ट टाकली. कामरासह अनेक ‘वोक’, ‘लिबरल’ आणि डाव्या विचारसरणीचे लोक संविधानाचा वापर केवळ स्वतःच्या अडचणीच्या वेळीच करतात.
एका छोट्याशा हॉटेलमध्ये सादर झालेल्या एका गाण्यावर एवढा मोठा वाद निर्माण होतो, तेव्हा त्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट होते. या संपूर्ण घडामोडीत कुणाल कामरा आणि उद्धव ठाकरे गट हे या यंत्रणेचे लाभार्थी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. स्टँड अप कॉमेडीच्या नावाखाली हल्ली राजकीय अजेंडा राबवला जातो. अशा शो ला प्रेक्षक म्हणून जाताना आपण ही डोळस राहणं गरजेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here