उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे असं सांगत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्तावच दिला आहे.
दिग्दर्शक-निर्माता महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येऊ शकता का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही”.
ते पुढे म्हणाले, “पण विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण महाराष्ट्राचं मोठं चित्र पाहण्याची गरज आहे, ते मी पाहतोच आहे. माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांतील मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा”