महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी १०७ पाकिस्तानी बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. १०७ पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, असे वृत्त माध्यमांत झळकले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे की, पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असे फर्मान सरकारने काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे. तर, मी सुद्धा भाषणात बोललो की, १०७ लोकं जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील, असा इशारा पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचा कारण नाही. जे आश्रय देतील त्यांना देखील सोडले जाणार नाही. म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडून निघून जावं, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली. तसेच, काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता. त्या ठिकाणी जाणे हे माझं कर्तव्य होतं. मात्र, त्यातही विरोधक राजकारण करतात, असेही शिंदेंनी म्हटले.