पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणाच्या माहितीनुसार, जिथे हल्ला झाला त्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांच्या मदतीसाठी ओव्हर ग्राउंड वर्कर नेटवर्क सक्रीय होतं. यामध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश होता. बैसरन खोऱ्यात पर्यटकांच्या वेषात वावरत ते दहशतवाद्यांना मदत करत होते, अशी माहिती मिळत आहे.
OGW नेटवर्कच्या माध्यमातून दहशतवादी आदिलने हल्ल्यापूर्वीच या लोकांना विविध भूमिका दिल्या होत्या. OGW बाहेरून आलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्यांच्या सतत आसपास वावरत होते. मात्र प्रत्यक्षात ते दहशतवाद्यांना दिशानिर्देश, माहिती आणि हालचालींची माहिती पुरवत होते. या संपूर्ण नेटवर्कचं मार्गदर्शन दहशतवादी फारुखच्या सांगण्यावरून आदिल करत होता, असं समोर आलं आहे. तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की, महिला आणि लहान मुलांकडे कोणी सहज संशय घेत नाही, आणि याचाच फायदा घेत बैसरन घाटीतील हल्ल्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला.