भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानकडून मागील तीन दिवसांपासून ड्रोन हल्ले केले जात आहे. भारताने हे ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून तुर्कीएकडून देण्यात आलेले ड्रोन भारताविरुद्ध वापरले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. असं असतानाच सोशल मीडियावर या ड्रोनसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ड्रोन स्मार्टफोनमधील लोकेशन ट्रेस करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच मोबाईल लोकेशन बंद करण्याचं आवाहन करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. मात्र याबद्दल आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.
युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. यापैकी अनेक बातम्या खोट्या आणि चुकीचे दावे करणाऱ्या आहेत. याच खोट्या माहितीविरोधात भारतीय सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाकडून फॅक्ट चेक अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. यावरुन खऱ्या आणि खोट्या बातम्या कोणत्या याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं जातं. “सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आम्हाला अधिकृत ईमेल आला असून त्यामध्ये एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या मोबाईलमधील लोकेशन तातडीने बंद करा. असं लक्षात आलं आहे की ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ला करण्यासाठी जास्त लोकसंख्या असलेली ठिकाणं या लोकेशनच्या माध्मयातून हेरली जात आहेत,” असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
या व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करताना पीआयबी फॅक्ट चेकच्या खात्यावरुन हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. “मोबाईल लोकेशन बंद करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्याचा दावा करणारी एक इमेज व्हायरल होत आहे. हा दावा खोटा आहे. अशाप्रकारचा कोणताही सल्ला भारत सरकारने दिलेले नाही,” असं या खात्यावरुन स्पष्ट करण्यात आलं आहे.