भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच असून युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक मिसाईल आणि ड्रोन नष्ट केले. भारताने त्यांच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या दाव्यावर भारताने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर आक्रमक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. पाकिस्तान ड्रोन आणि इतर लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. नियंत्रण रेषेवरही जड कॅलिबर आणि ड्रोन शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील श्रीनगर ते नालियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी हवाई घुसखोरीचे प्रयत्न केला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानचे हल्ले उलथवून टाकले आहेत. मात्र, उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भुज, भटिंडा या हवाई दलाच्या तळांचे नुकसान झाले अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाकिस्तानने पहाटे १.४० वाजता हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर करून पंजाबमधील एअरबेस स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एका निंदनीय कृत्यात, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई दलाच्या तळांवरील वैद्यकीय केंद्रे आणि शाळेच्या परिसरांना लक्ष्य केले.
पाकिस्तानने जाणूनबुजून लष्कर तळांवर हल्ले केले. भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांना टार्गेट केले. यामध्ये रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले.
आपल्या कारवाया लपवण्यासाठी पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा गैरवापर केला. पाकिस्ताननेही अनेक खोट्या बातम्या पसरवल्या. भारताचे अनेक लष्करी तळ नष्ट केल्याचे खोटे दावे केले आहेत.