राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने धमकावलं होतं असा गौप्यस्फोट स्वत: राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. “सरकार पाडायला मदत करा अन्यथा तुरूंगात जाल,” अशी धमकी संजय राऊत यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन एका भाजपा नेत्याने दिल्याचा संपूर्ण घटनाक्रम राऊतांनी पुस्तकामध्ये सांगितला आहे.
“मी दिल्लीत असताना एके दिवशी रात्री नऊ वाजता भाजपा परिवारातील माझ्या हितचिंतकाचा फोन आला. ते म्हणाले, “भेटायला यायचं आहे. बरोबर कुणीतरी आहे. विषय महत्त्वाचा आहे.” “यायला हरकत नाही,” असे कळवताच माझे हितचिंतक मित्र आणि इतर तिघे जण 15, सफदरजंग लेनवर पोहोचले. चहापान करत दिल्लीतील घडामोडींवर गप्पा झाल्या. त्या काळी माझे हे हितचिंतक महाराष्ट्रातून दिल्लीत संघ परिवाराच्या संघटन कार्यासाठी मुक्कामास होते. वैचारिक मतभेद असतानाही आमच्यातले नाते कायम राहिले. “संजयजी, महाराष्ट्रातले सरकार हे अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर आले आणि ते फार काळ चालवता येणार नाही, असे दिल्लीतील आमच्या लोकांचे म्हणणे आहे,” त्या मित्राने बोलायला सुरुवात केली.”
“तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?”
“तुम्ही सुज्ञ आहात!”
“हे तुमच्याबरोबरचे कोण? आपण परिचय करु दिला नाही…”
“हे संघ परिवारातील माझे सहकारी आहेत. महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.”
“लक्ष कोणावर?”
“खास करुन तुमच्यावर…”
“का?”
“सरकार आणण्यात तुमचा सहभाग आहे. आता हे सरकार घालवण्यासाठी तुमचंच सहकार्य हवं. या सरकारच्या पाठीशी उभे राहू नका.”
“आता या सरकारशी माझा तसा संबंध नाही. सरकार मजबूत आहे आणि एकदा आलेली सत्ता सहसा कोणी सोडत नाही,”
“तुम्ही आम्हाला मदत करू शकता.”
“कशी?”
“आम्ही शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावतोय. काम सुरु आहे. तुम्ही उगाच आडवे येऊ नका.”
“आमचे आमदार कशाला फुटतील?”
“फुटतील! तुम्ही गप्पा राहा. जमल्यास सामील व्हा. महाराष्ट्रात उलथापालथ होईल.”
“आम्ही सरकार वाचवू. मोठे बहुमत आहे. पक्षांतरविरोधी कायद्यात आमदारांची फूट बसणार नाही. विधानसभा अध्यक्ष जागेवरच निर्णय घेतील!”
“तुम्ही सगळे अंधारात आहात. मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतोय, शांत राहा. नाहीतर ईडी, सीबीआय तुम्हाला थंड करेल. तशा हालचाली सुरू आहेत. तुम्ही एकटे पडाल! महाराष्ट्रातले सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरुंगात जावे लागेल!”
“ही तर धमकी आहे,”
“मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सावध करायला आलोय. काळजी घ्या!”
रात्री अकरा वाजता ‘हितचिंतक’ म्हणवून घेणारे निघून गेले. मी त्यानंतर अस्वस्थपणे बंगल्याच्या मागच्या बाजूला येरझाऱ्या घालू लागलो.
आज पुस्तकाचं प्रकाशनराऊत यांनी लिहिलेल्या, ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज म्हणजेच, शनिवारी, १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात प्रकाशन पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.