बिहार पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. ADG STF कुंदन कृष्णन यांनी एक अजब तर्क केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जूनमध्ये हत्येच्या घटना जास्त होतात. कारण या मोसमात शेतकऱ्यांकडे काही काम नसते. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांकडे काहीच काम नसते त्यामुळं गुन्हेगारीत वाढ होते, असं कृष्णन यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसताहेत. हत्या, गोळीबार आणि सुपारी किलिंगसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यात सीरियल मर्डरची प्रकरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
तेजस्वी यादव यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. असा तर्क आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. आता स्वतः पोलिसांनीच मान्य केलंय की गुन्हे वाढताहेत आणि त्याचा दोष हवामानावर ढकलला जातोय. याचा अर्थ साफ आहे की, पोलिस अपयशी होत आहेत. हे विधान त्यांची लाचारी दर्शवतंय आणि हे स्पष्ट आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.