पावसाळ्याचा दिवसात वाढलेली आर्द्रता आणि पाण्यामुळे होणारे संसर्ग यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि पेरिफेरल आर्टरीचे आजार (PAD) सारख्या रक्तवाहिन्यांच्या आजारांमध्ये वाढ होते. या आजारांवर मात कशी करता येईल हे जाणून घेऊ.
पावसाळ्यात अनेकदा पाण्यामुळे होणारे आजार आणि त्वचेच्या संसर्गात वाढ होते, हे प्रत्येकालाच माहित आहे. मात्र अंतर्निहित रक्तवाहिन्यांच्या आजार असलेल्या व्यक्तींसाठी हा ऋतू धोकादायक ठरतो. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा रक्ताभिसरणाच्या समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण दमट हवामानामुळे सूज येणे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि पायांचे गंभीर संक्रमणाची शक्यता वाढते.
रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे शरीराच्या रक्तवाहिन्या, विशेषतः धमन्या आणि शिरा प्रभावित होतात. सामान्य आजारांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT), पेरिफेरल आर्टरीचे आजार (PAD) आणि क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी(CVI) यांचा समावेश होतो. या परिस्थितींमुळे अनेकदा रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येतो, रक्तवाहिन्यांना सूज येते, वेदना होतात आणि संसर्गाची शक्यता वाढते.
चुकीची जीवनशैली, धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्येमुळे अनेकदा रक्तवहिन्यासंबंधी आजार होऊ शकतात. यावेळी पाय दुखणे, पायांमध्ये सूज आणि जडपणा येणे, फुगलेल्या शिरा ,पायांच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा जखमा बरे होण्यास वेळ लागणे अशी लक्षणे दिसून येतात.