लाडक्या बहिणींना महायुतीचा धक्का! 5 लाख बहिणी ठरल्या अपात्र

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. संजय गांधी निराधार योजना, कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी वाहन अशा विविध कारणांमुळे राज्यातील पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. महायुतीच सरकार स्थापन झाल्यानंतरच याबाबत घोषणा करण्यात आली होती. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होती आणि आता 5 लाख लाडक्या बहिणी या दोडक्या ठरल्या आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यासही सुरुवात झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण सात हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यादेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या.
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here