कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील ३६ वर्षीय महादेवी (माधुरी) हत्तीण गुजरातमधील वनतारा पशु कल्याण केंद्रात हस्तांतरित झाल्याने गावकरी आणि परिसरातील भाविक संतप्त झाले होते. मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण लागले असून, वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांच्या टीमने नांदणी मठात भेट देऊन मठाधिपतींसोबत तब्बल दीड तास चर्चा केली.
मठाधिपतींनी वनताराचे सीईओ विहान करणी यांच्याकडे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर देताना वनताराने स्पष्ट केले की, महादेवीला गुजरातच्या वनतारा केंद्रात नेण्याचा निर्णय हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग होता आणि त्यात वनताराचा थेट संबंध नाही. तथापि, जनभावना लक्षात घेता, जर मठाने आणि गावकऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, तर महादेवीला परत आणण्याची शक्यता आहे. वनताराच्या सीईओंनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. असे असले तरी यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केले.
बैठकीत वनताराच्या सीईओंनी नांदणी परिसरात पशु कल्याणासाठी एक युनिट उभारण्याची तयारी दर्शवली. यामुळे स्थानिक पातळीवर प्राण्यांच्या संरक्षण आणि कल्याणासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.