पुण्यातील गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच वादाला तोंड फुटल्याचं चित्र दिसत आहे. यंदा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी (7 सप्टेंबर) दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण सुरू होत असल्याने वेळेत विसर्जन पूर्ण करण्याचं आवाहन गणेशमंडळांसमोर असणार आहे. ग्रहणाचा विचार करुनच मानाच्या पाच गणपतींनंतर कोणतं मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये लवकर सहभागी होणार यावरुन मतभेद आहेत. याच विषयावर शहरातील दोन महत्त्वाच्या मंडळामध्ये वाद निर्माण झाला आहे.
दुसऱ्याच दिवशी ग्रहण असल्याने, यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक लवकर सुरू होईल आणि लवकरच संपेल, अशी शक्यता आहे. गणेशोत्सव धार्मिक आणि श्रद्धेचा उत्सव आहे, त्यामुळे सर्वानी मिळून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले जात असून चर्चेतून या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वच मंडळं उत्सुक असल्याने हा वाद चर्चेनं सोडवणार आहे.