नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, आतापर्यंत १८ जणांचा बळी

नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी ट्रेन पकडण्याच्या आशेने प्रवाशांची मोठी गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर पोहोचली तेव्हा ही घटना घडली. महाकुंभाला जाण्यासाठी गाड्या पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली, ज्यामुळे गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बहुतेक मृतांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये तीन मुलंही आहेत. प्रवाशांची अचानक गर्दी आणि विलंब यामुळे चेंगराचेंगरी झाली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांसह आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. डीसीपी (रेल्वे) केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, चेंगराचेंगरीचे मुख्य कारण म्हणजे दोन गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची संख्या वाढली.

डीसीपी म्हणाले, खरं तर, एका ठिकाणी ट्रेन उशिराने धावत होती आणि लोकांनी प्रयागराजसाठी जास्त तिकिटं खरेदी केली होती. आम्ही गर्दीचे मूल्यांकन केलं होतं. चेंगराचेंगरी होण्यामागचं कारण काय आहे याचा तपास अधिकारी करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, रेल्वे स्टेशनवर कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here