आयआयटी बाबांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

आयआयटीवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे अभय सिंह यांनी नोएडा येथील एका खासगी वाहिनीवरील चर्चेदरम्यान आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत अभय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच काही लोकांनी भगवाधारी वस्त्र घालून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अभय सिंह यांनी पोलीस तक्रारीत केला आहे.

प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप केल्यानंतर अभय सिंह हे सेक्टर २६ च्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनालाही बसल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, पोलिसांनी समजावल्यानंतर अभय सिंह यांनी आपलं निषेधाचं आंदोलन मागे घेतलं आहे. दरम्यान, या संदर्भातले काही व्हिडीओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) व्हायरल झाले आहेत. यावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या बरोबरच अभय सिंह यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, प्रयागराजच्या महाकुंभ २०२५ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये अभय सिंह यांच्या नावाचा समावेश होता. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले अभय सिंह महाकुंभमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरले होते. अभियंता होण्यापासून ते आध्यात्म स्वीकारण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाने अनेकांना भुरळ घातली आणि अनेकांचे लक्ष वेधले. परंतु, त्यांच्या लोकप्रियतेने अनेकदा नाट्यमय वळण घेतल्याचंही पाहायला मिळालं. जुना आखाड्याने अभय सिंह यांना शिस्तीच्या कठोर संहितेचा भंग केल्याचा आणि त्यांचे गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत आखाड्यातून बाहेर काढले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here