रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी अनिकेत भोईला पोलिसांनी अटक केली आहे. रक्षा खडसेंच्या अल्पवयीन मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची त्याने छेड काढली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाशिवरात्रीच्या यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.