काही दिवसांपूर्वी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भारतात लठ्ठपणाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली.चिंताजनक बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे.आज काल अनेक जण लठ्ठपणाच्या समस्येने त्रासले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या चार पटीने वाढली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी देशातील दिनेश लाल यादव, उद्योजक आनंद महिंद्रा,मनु भाकर, आर माधवन,गायिका श्रेया घोषाल, नंदन नीलेकणी, सुधा मूर्ती, मोहनलाल , मीराबाई चानू यांना त्यांच्या जेवणातील तेल १०% कमी करण्याचे आव्हान देईन. मी त्यांनाही १० नवीन लोकांना हेच आव्हान देण्याची विनंती करेन.मला खात्री आहे की यामुळे लठ्ठपणाशी लढण्यास खूप मदत होईल.” मी सर्वांना देशाच्या या मोठ्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करतो. असंही ते म्हणाले. आता काँग्रेस प्रवक्त्यांनी हे खूप मनावर घेतलं वाटतं. याचा अर्थ तुम्ही कुणालाही तू लठ्ठ आहे असं म्हणू शकत नाही. पण काँग्रेसवाल्यांना बोलण्याचा काही पाचपोच नाहीये हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं.
काँग्रेसचे प्रवक्ते, नेते कधी काय बोलतील हे सांगता येत नाही. जसा राजा तशी प्रजा. राहुल गांधी ज्याप्रमाणे काहीही बोलतात त्याप्रमाणे त्यांचा पक्ष. आता कुठलेच राजकीय नेते उरले नाहीत की त्यांच्यावर काँग्रेसने टीका केली नाही म्हणून की काय. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या वजनावर टीका केली. म्हणजे आता काँग्रेस प्रवक्ते बॉडी शेमिंग करायला लागले.
रविवारी भारत आणि न्यूझीलंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट अ सामन्यादरम्यान, शमा मोहम्मद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर रोहित शर्माला “जाडा खेळाडू” आणि “निष्प्रभ कर्णधार” असं म्हटलं. त्यांनी लिहिलं, “रोहित शर्मा लठ्ठ आहे! त्याने वजन कमी करण्याची गरज आहे! आणि नक्कीच, तो भारताचा सगळ्यात प्रभावहीन कर्णधार आहे.”
या विधानावर प्रतिक्रिया देताना बीसीसीआय सचिवांनी आयएएनएसला सांगितलं, “जेव्हा टीम इंडिया आयसीसी स्पर्धा खेळत आहे, तेव्हा कोणत्याही नेत्याने अशा प्रकारची टिप्पणी करणं धक्कादायक आहे.”
या टीकेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. वाद वाढतोय हे लक्षात आल्यानंतर वाढत्या विरोधामुळे काँग्रेस पक्षाने शमा मोहम्मद यांना त्यांची पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले. त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.
पण पोस्ट करून या ताई शांत बसल्या नाहीत तर एका युजरच्या कमेंट ला उत्तर देताना पण त्यांनी अकलेचे तारे तोडले.
रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे, अशी एक्स पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती. या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला, “रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधार पदाची संधी मिळाली.
या संदर्भात काँग्रेस नेते पवन खेड़ा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट लिहिली – “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी क्रिकेटच्या एका दिग्गज खेळाडूवर केलेल्या टिप्पण्या पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. काँग्रेस पक्षाने असं म्हणून हात झटकले.
शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांमध्ये पक्षाला वाचवू न शकणाऱ्या लोकांनी वर्ल्डकप जिंकणाऱ्या कर्णधाराबद्दल बोलू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
प्रत्येकाला बोलण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.. पण याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याच्या शारीरिक स्थितीवरून विधान करणार तर हे योग्य नाही. आणि काँग्रेस सारख्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडून तरी हे अपेक्षित नाही.
तुमची आवड निवड वेगळी असू शकते… काहींना विराट कोहली आवडतो तर कोणाला रोहित शर्मा.. जर तुम्हाला वैयक्तिक तो आवडत नाही तर त्याचं प्रदर्शन तुम्ही सोशल मीडियावर अशा पद्धतीने बॉडी शेमिंग करून कसं करू शकता? तो अधिकार कुणालाच नाही. वैयक्तिक टीका करताना कोणावरही तुमचा विरोधक असला तरी थोडं भान राखणं गरजेचं आहे. या अतिशय बेसिक गोष्टी आहेत. याला शिष्टाचार म्हणजे मॅनर्स म्हणतात. आता काँग्रेस प्रवक्त्यांनी हे शिकून घेण्याची गरज आहे.