बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले. याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रातून अनेक खुलासे झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला सीआयडीच्या दोषारोप पत्रातून या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. काळीज चिरणारे ते फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराड व त्याच्या टोळीविरोधात कठोर कारवाई करण्याची तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. दरम्यान, घटनेच्या ८० दिवसांनंतर, देशमुख कुटुंबाच्या संघर्षानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”