उत्तर प्रदेशमधील बरेलीचे मौलाना शाहबुद्दीन रझवी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर संतापले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शमीने रमजानच्या महिन्यात रोजा पाळलेला नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी तो मैदानात सरबत/एनर्जी ड्रिंक पिताना दिसला होता. रझवी म्हणाले, “त्याने जाणून बुजून रोजा पाळलेला नही. हा खूप मोठा गुन्हा आहे. शरीयतच्या नियमानुसार शमी गुन्हेगार आहे”. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नुकताच आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील उपांत्य सामना भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान, भारताची गोलंदाजी चालू असताना मोहम्मद शमी मैदानावर सरबत पिताना दिसला होता. यावर ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष व बरेलीचे मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी आक्षेप घेतला आहे.
रझवी यांनी म्हटलं आहे की “इस्लाममध्ये रोझा पाळणं हे कर्तव्य आहे. एखादी व्यक्ती जाणून बुजून रोजा पाळत नसेल तर तो अट्टल गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीने रोजा पाळला नाही. मुळात ते त्याचं कर्तव्य आहे. रोजा न पाळून मोहम्मद शमीने मोठा गुन्हा केला आहे. शरीयतच्या नियमानुसार तो मोठा गुन्हेगार आहे. त्याला आता मफी मागावी लागेल.”
शमीला आता माफी मागावी लागेल – रझवी
शाहबुद्दीन रझवी म्हणाले, “मोहम्मद शमीने असं करायला नको होतं. मी त्याला सल्ला देतो की इस्लामचे जे नियम आहेत ते त्याने पाळायला हवेत. त्याने क्रिकेट खेळावं, त्याला हवी ती कामं करावी, परंतु, अल्लाहने माणसांवर जी जबाबदारी सोपवली आहे ती त्याने पार पाडायला हवी. शमीला या गोष्टी कोणीतरी समजावून सांगितल्या पाहिजेत. शमीने जी चूक केली आहे त्यासाठी त्याला आता अल्लाहची माफी मागावी लागेल.”
#WATCH | Bareilly, UP: President of All India Muslim Jamaat, Maulana Shahabuddin Razvi Bareilvi says, "…One of the compulsory duties is 'Roza' (fasting)…If any healthy man or woman doesn't observe 'Roza', they will be a big criminal…A famous cricket personality of India,… pic.twitter.com/RE9C93Izl2
— ANI (@ANI) March 6, 2025
रझवी यांनी शमीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही मुस्लीम लोक त्याला समाजमाध्यमांवर ट्रोल करत आहेत. अशात. एमसीएचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी शमीची बाजू घेतली आहे. पवार म्हणाले, शमी हा एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारत देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याला वाटलं असेल की मी जर रोजा ठेवला किंवा उपवास केला तर याचा माझ्या कामगिरीवर परिणाम होईल आणि त्यामुळे काही चुकीचं घडून भारतीय संघाने सामना गमावला तर तो कधी सुखाने झोपू शकणार नाही, जगू शकणार नाही. तो एक भारतीय आहे. त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे भारताचं प्रतिनिधीत्त्व करताना हा विषय नाही आणला पाहिजे.”