लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक जुळवाजुळव करत असताना आता निधीसाठी सरकारची दमछाक होतेय का? असाच प्रश्न उभा राहत आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे या योजनेसाठी घेण्यात आलेला आदिवासी विकास विभागाचा निधी वळता होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींच्या निधीसाठी या विभागातून तब्बल ३५७ कोटी ७० लाख रुपये वळवण्यात येणार असून, सामाजिक न्याय विभागापाठोपाठ आता आदिवासी विकास विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाकडून निधी वर्ग केल्याचा जीआर समोर आल्यानं ही बाब समोर आली.
प्राथमिक माहितीनुसार आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार आहे. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे. दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र निधी वळवल्याच्या बातम्या खोट्या असल्याचंच म्हटलं आहे. मात्र आता शासन या परिस्थितीवर नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.