एअरपोर्ट सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी एअर इंडिया सॅट्स सर्व्हिसेसने (AISATS) अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर काही दिवसांनी सेलिब्रेशन केल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कंपनीने या घटनेला गांभीर्याने घेतलं असून, चार वरिष्ठ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. AISATS ही एअर इंडिया आणि सिंगापूरच्या SATS लिमिटेडची ग्राउंड हँडलिंग जॉइंट व्हेंचर कंपनी आहे.
शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, AISATS ने म्हटलं आहे की, “AI 171 दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्वांच्या कुटुंबियांसोबत आम्ही उभे आहोत आणि मनापासून शोक व्यक्त करतो. अलीकडेच व्हायरल झालेल्या आमच्या कार्यालयातील व्हिडिओबद्दल आम्हाला खेद आहे. हे वर्तन आमच्या मूल्यांशी सुसंगत नाही. आम्ही जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. आम्ही संवेदनशीलता, व्यावसायिक दृष्टिकोन आणि जबाबदारीसाठी आमची वचनबद्धता पुन्हा स्पष्ट करत आहोत”.