भारतातील सर्वोच्च न्यायालयात देखील आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आणि मशीन लर्निंगचा (एमएल) वापर केला जात आहे. न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी आणि जलद करण्यासाठी न्यायालयांमध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत दिली आहे. केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाच्या खटल्यांमधील तोंडी युक्तिवाद आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषांतरित केले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रामुख्याने तोंडी युक्तिवाद लिहिण्यासाठी, केस दाखल करण्यासाठी आणि कायदेशीर कागदपत्रांचे भाषांतर करण्यासाठी केला जात आहे. न्यायालयीन निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही. या उपक्रमाचा उद्देश केवळ न्यायालयाच्या कामकाजाला गती देणे नाही.तर न्यायाधीशांना कायदेशीर संशोधनात मदत करणेदेखील आहे, असेही मंत्री मेघवाल यांनी म्हटले आहे.
18 भारतीय भाषांमध्ये निकालांचे भाषांतर करण्यासाठी एआय या साधनांचा वापर करत आहेत. या भाषांमध्ये हिंदी, तमिळ, बंगाली, तेलगू, मराठी, उर्दू, गुजराती, कन्नड, पंजाबी, मल्याळम, आसामी, ओडिया, नेपाळी, काश्मिरी, कोकणी, संथाली, गारो आणि खासी यांचा समावेश आहे.