पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं सारा देश हादरला. निसर्गाच्या कुशीत दडलेल्या पर्यटनस्थळी गेलेल्या २७ निष्पापांना तिथंच प्राण गमवावे लागले आणि कट्टरपंथीयांच्या या दहशतीपुढं पुन्हा माणुसकी ओशाळली. धर्म विचारून हल्ला करणाऱ्या या भ्याड दहशतवाद्यांनी ज्यांचा बळी घेतला, त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही आपली माणसं गमावल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवता येत नाहीये. कानपूरमधील व्यावसायिक शुभम द्विवेदीच्या पत्नीचाही यात समावेश आहे.
ऐशान्याच्या समोरच तिच्या पतीवर, शुभमवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आणि तिथूनच त्यांनी गोळीबाराचं रक्तरंजित सत्र सुरू केलं. शुभमचं पार्थिव ज्यावेळी त्याच्या मूळ गावी आलं तेव्हा तिथं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. आई ओक्साबोक्शी रडत होती, पत्नी ऐशान्या तर स्वत:च्या पायावर उभीसुद्धा राहू शकत नव्हती.
कैक तास ती पतीच्याच पार्थिवापाशी बसून त्याकडे एकटक पाहत होती. भेदरलेली आणि शून्यात गेलेली तिची नजर असंख्य प्रश्नांसह त्याच्यावरच खिळली होती. हे जे काही घडलं ते सत्य नाहीये, असंच ती नकळत स्वत:ला समजवत होती. तितक्यातच अचानक ती तिथून उठून थेट घरातील एका खोली आली आणि अंगावर शुभमच्या आवडीचं शर्ट घालून ती बाहेर आली. पार्थिवापाशी आल्यानंतर त्याच शर्टात तोंड दाबून ती आक्रोश करू लागली, ओक्साबोक्शी रडू लागली. आर्त हाका मारू लागली, इतक्या की तिच्या एका तरी हाकेला शुभम प्रतिसाद देईल.