भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांना अचूक लक्ष्य केलं आणि संपूर्ण ऑपरेशनला फक्त २३ मिनिटं लागली अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली आहे. आयआयटी मद्रासच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलताना अजित डोवाल यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासाचं आवाहनही केलं.
“आपल्याला आपलं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करावं लागेल. येथे सिंदूरचा उल्लेख करण्यात आला. तिथे जितकी स्वदेशी सामग्री होती त्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. आम्ही पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. ही तळं सीमेवरील परिसरात नव्हती. आमचं एकही लक्ष्य चुकलं नाही. आम्ही त्याशिवाय इतर कुठेही हल्ला केला नाही,” असं डोवाल यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी सांगितलं की, “आम्ही योग्य ठिकाणी लक्ष्य केलं, कारण तिथे कोण आहे हे आम्हाला माहिती होतं. संपूर्ण ऑपरेशनला २३ मिनिटं लागली”. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. मात्र त्यासंबंधी परदेशी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांवर अजित डोवाल यांनी टीका केली. तसंच त्यांना भारतात झालेल्या नुकसानाचे कोणतेही व्हिडीओ दाखवण्याचं आव्हान दिलं. “परदेशी माध्यमांनी म्हटले आहे की पाकिस्तानने हे केलं, ते केलं… तुम्ही मला एक फोटो दाखवा. एक फोटो ज्यामध्ये कोणत्याही भारतीय वास्तूचं नुकसान झालं आहे,” असं डोवाल म्हणाले.