वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर झालं. मात्र, मध्यरात्री १२ नंतर विधेयकावर घेतलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेला ‘वॉशरूम ब्रेक’ चर्चेचा विषय ठरला. या मुद्द्यावरून विरोधी बाकांवरून काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला खरा, पण अवघ्या काही मिनिटांत त्यांना त्यांच्याच दोन खासदारांमुळे माघार घ्यावी लागली!
लोकसभेत बुधवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दोन तास चाललेल्या मतदान प्रक्रियेनंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. तब्बल १२ तासांहून जास्त काळ चर्चा केल्यानंतर मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांनी वक्फ सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलं. पुढचे जवळपास दोन तास मतदानाची तीन टप्प्यांत प्रक्रिया चालली. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मतदानादरम्यान उठून सभागृहाबाहेर गेल्यामुळे मोठा गदारोळ झाला. खुद्द अध्यक्षांनी त्यांची ही कृती रास्त असल्याची भूमिका मांडली.