बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आता या हत्येचे अनेक फोटो समोर आले आहेत. अतिशय चीड आणणारे, मन सुन्न करणारे असे हे फोटो आहेत. हत्येचे क्रूर पद्धतीचे फोटो समोर आल्यानंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. केज शहरात या बंदला प्रतिसाद देत सर्व तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत. याठिकाणी तरुण आक्रमक होत घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहे. आज अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीने आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील आहेत. त्यातून अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांचा छळ करून त्यांना मारण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. हे सगळे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज संतोष देशमुख यांच्या समर्थकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे.