बँकिंग, विमा, टपाल ते कोळसा खाण, महामार्ग आणि बांधकाम अशा क्षेत्रातील २५ कोटींहून अधिक कामगार बुधवारी ९ जुैलला देशव्यापी सार्वत्रिक संपावर जाणार असून त्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. ज्यामुळे देशभरातील अनेक जीवनवाश्यक सेवा विस्कळीत होण्याची भीती वर्तविण्यात आले आहे. केंद्राच्या आर्थिक धोरणांविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी हा संप पुकारला आहे. तर ९ जुलैला होणाऱ्या भारत बंदमध्ये बँकिंग क्षेत्र सहभागी होणार असल्याचं, बँक कर्मचारी संघटनेने सांगितलंय.
“सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट धोरणांचा निषेध करण्यासाठी” १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संघटना आक्रमक झाल्या असून ते बुधवारी ९ जुलैला संपावर जाणार आहेत.
दरम्यान, ९ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कार्यालये सुरु राहणार आहे. पण, वाहतुकीच्या समस्यांमुळे काही भागात सामान्य कामकाज विस्कळीत होणार आहे. अनेक शहरांमध्ये कामगार संघटना आणि संलग्न गट निषेध मोर्चे आणि रस्त्यावर निदर्शने करत असल्याने सार्वजनिक बसेस, टॅक्सी आणि अॅप-आधारित कॅब सेवांवर परिणाम होणार आहे. यामुळे स्थानिक प्रवास आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्समध्ये विलंब किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.