हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजपने दमदार कामगिरी करत एकहाती सत्ता मिळवली. दिल्लीत तर 27 वर्षांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं. लोकसभेनंतर महाराष्ट्रातही भाजपने दमदार कामगिरी केली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढलेला आहे. दिल्लीनंतर आता भाजपने मिशन बिहार सुरू केलंय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे लक्ष असणार आहे ते म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीकडे. दिल्लीतील विजयानंतर भाजपचा उत्साह कमालीचा शिगेला पोहचला आहे आणि याचा थेट परिणाम बिहार निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांनी भाषणात बिहारचा उल्लेख करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विकासकामांचा उल्लेख केला. तेव्हाच दिल्ली काबीज केल्यानंतर आता भाजप व रालोआचे आगामी लक्ष बिहार विधानसभा निवडणूक असल्याचे दिसून आले.

बिहारमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपने आतापासून रणनीती आखायला सुरुवात केलीय.
एनडीएने २४३ विधानसभा सदस्यांपैकी २२५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे. परंतु बिहारची निवडणूक इतर कोणत्याही राज्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. रालोआतून मुख्य चेहरा म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव असेल.

बिहारची समीकरणं
गेल्या तीन दशकांपासून बिहारच्या राजकारणावर नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव या दोन नेत्यांनी प्रभाव प्रस्थापित केला आहे. नितीश कुमार हे दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. सध्या नितीश कुमार भाजप प्रणित एनडीए आघाडीत आहेत. जरी लालू यादव यापुढे राजकीयदृष्ट्या सक्रिय नसले तरी बिहारमधील त्यांचा प्रभाव कमी झाला नाही. त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आता लालू यादव यांच्या राजकीय वारसाला पुढे आणत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप स्वतःच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की.