भाजप दक्ष… मिशन राष्ट्रीय अध्यक्ष!

भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 14 मार्चपूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. फेब्रुवारीच्या अखेरीस 18 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. भाजपच्या घटनेनुसार देशातील किमान अर्ध्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडून आल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होऊ शकते.

गेल्या जानेवारी अखेर पर्यंत भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणं अपेक्षित होतं.. मात्र महाराष्ट्र, हरियाणा त्यापाठोपाठ झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबत गेली.. जे पी नड्डा यांना पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री पद असा दुहेरी भार सांभाळावा लागत आहे. जे पी नड्डा यांच्यानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाईल याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.. महाराष्ट्र विधानसभेनंतर अनेक नावं चर्चेत होती.. विनोद तावडे यांचं नाव पण चर्चेत होतं.. पण आता वेगळी नावं पुढे आली आहेत.. अध्यक्षपद निवडीसाठी सुद्धा काही नियम आहेत एक प्रक्रिया आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात संघाची मोठी भूमिका असते.. 11 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी भाजप नेते मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक झाली.. गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा सहभागी झाले होते.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे भाजप संघ यांच्यात समन्वय निर्माण करणारे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार उपस्थित होते.. सुमारे 5 तास चाललेल्या या बैठकीत संघाने भाजप अध्यक्षपदाची निवड संघाच्या सल्ल्यानेच होणार असल्याचं स्पष्ट केलं.


तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल जे पी नड्डानी एक विधान केलं होतं.. भारतीय जनता पार्टी आता सक्षम झाली असून आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) गरज उरली नाही, असं वक्तव्य जे पी नड्डांनी केल होतं.. लोकसभेला निकालावर परिणाम दिसला.. आणि त्यानंतर संघाच्या मदतीने भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केली.. त्यामुळे संघाची ताकद सोबत नसेल तर भाजप ला विजय मिळणं अवघड आहे.. आणि संघाची ताकद सोबत असेल तर भाजप जोरदार मुसंडी मारतो हे आता स्पष्ट झालंय..त्यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीत संघाचा वरचष्मा आहे.. संघाची मान्यता महत्त्वाची आहे..

यावेळी नवीन अध्यक्ष हा दक्षिण भारतातील असण्याची शक्यता आहे. कारण पुढील 3 वर्षात दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि तेलंगणा या 5 राज्यात निवडणुका आहेत.. भाजपचे लक्ष आता दक्षिणेकडील राज्यांवर अधिक आहे.. आणि 20 वर्षांपासून दक्षिण भारतातील एकही नेता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालेला नाही.. दक्षिण भारतातून शेवटचे भाजप अध्यक्ष 2002-2004 दरम्यान व्यंकय्या नायडू (आंध्र प्रदेश) होते. सध्याचे राष्ट्रपती पूर्व भारतातील आहेत आणि उपराष्ट्रपती पश्चिम भारतातील आहेत. पंतप्रधान उत्तर भारतातून (वाराणसीचे खासदार) येतात. अशा परिस्थितीत, दक्षिण भारतातील एखाद्या नेत्याला जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.


दक्षिण भारतातील कोणाची नावं शर्यतीत आहेत पाहुयात

सध्या दक्षिणेतील प्रमुख भाजप नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी, एल मुरुगन, जी किशन रेड्डी, के अन्नामलाई, के ईश्वरप्पा, दग्गुबाती पुरंदेश्वरी आणि निर्मला सीतारमण यांचा समावेश आहे.

निर्मला सीतारामन यांचा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये संपर्क आहे.. संघटनेने निर्मला सीतारमण यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली, तर त्यांनी यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांचा शेवटचा असू शकतो. तसेच, भाजपाच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला जाईल. भाजपमध्ये आतापर्यंत या पदावर एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही.

दाक्षिणात्य सुषमा या नावाने प्रसिद्ध असलेल्या दग्गुबाती पुरंदेश्वरी यांचं नाव चर्चेत आहे. 2015 मध्ये त्या भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी झाल्या.. जुलै 2023 पासून त्या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष आहेत..

कर्नाटकचे प्रल्हाद जोशी यांचं नाव पण चर्चेत आहे.. 2004 पासून ते सातत्याने धारवाड लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत..दक्षिणेत पाय रोवायचा असेल तर दक्षिणेचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो..
पण भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, केशव प्रसाद मौर्य, राजीव चन्द्रशेखर, स्मृती इराणी, सर्बानंद सोनोवाल या नेत्यांची पण चर्चा आहे. मात्र भाजप धक्कातंत्रासाठी ओळखला जातो.. एक नवीन नाव पण उदयास येऊ शकते.. की ज्याची अजिबात चर्चा नाही.. अध्यक्ष निवडताना केवळ पक्षहित पाहून चालणार नाही.. तर राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुड बुक मध्ये असणंही तितकंच महत्वाचं आहे. भावी अध्यक्ष म्हणून अनेक नावांवर मागील काही काळात बरीच चर्चा रंगली.. असं असलं तरी आश्चर्यकारक नाव पक्षाकडून समोर आणलं जाऊ शकतं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here